योगी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष असून त्यांच्यात एक राजकारणी दडलाय; सामनातून भाष्य

योगी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष असून त्यांच्यात एक राजकारणी दडलाय; सामनातून भाष्य

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर महाविकास आघाडीकडून आरोप केले जातात. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी हॉटेल ताज समोर रोड शो केला.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे. तेव्हाही त्यांना इंधन लागणार आहे, असे सूचक संकेतही सामनातून देण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ महाराज वरचेवर मुंबईत येत असतात. त्यात गैर काहीच नाही. पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? तर राज्यातील रोजगार बुडाल्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राचे अडीच लाख कोटी गुंतवणुकीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. राज्यातील रोजगार गुजरातला वळवण्यात आल्यानेच हे घडल्याचा दावा करतानाच मुंबई बाबत लंगडतोड सुरू आहे. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच “उत्तर प्रदेश हे विकासाचे इंजिन आहे. त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत उतरले. मुंबईतील मोठ्या उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले, त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत ‘रोड शो’ करण्याची गरज काय? योगींच्या रोड शोमध्ये नक्की कोणते उद्योगपती सामील झाले व त्यांनी योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलतजादा म्हणजे गुंतवणूक केली, यावर सुद्धा प्रसिद्धी मिळाली पाहिजे. उद्योगपतींना भेटणे, आपल्या राज्याच्या उद्योगविषयक धोरणांबाबत प्रेझेंटेशन देणे वेगळे व त्या उद्योगपतींना आकर्षित करण्याच्या नावाखाली मुंबईत रोड शोचे आयोजन करणे वेगळे. योगींचा मुंबईतील रोड शो ही भाजपा पुरस्कृत राजकीय खेळी आहे. उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे” असे म्हटले आहे.

यासोबतच आम्ही योगींचं मुंबईत स्वागत करतो. मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा, असा सल्लाही सामनातून योगींना देण्यात आला आहे. या शिवाय योगी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष असून त्यांच्यात एक राजकारणी दडला आहे. “योगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते आहेत. महाराष्ट्रातील फुटकळ नेत्यांच्या सल्ल्याने वागून त्यांनी स्वतःची अप्रतिष्ठा करून घेऊ नये. उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबई-महाराष्ट्राने नेहमीच योगदान दिले आहे. मुंबईत लाखो हिंदी भाषिक रोजीरोटीसाठी येऊन चांगल्यापैकी स्थिरावले आहेत. त्यांच्याच अर्थकारणावर उत्तर प्रदेशात लाखो चुली पेटत आहेत. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. शेवटी देश व समाज म्हणून आपण एक आहोत. उत्तर प्रदेशचा विकास मुंबई निवासी उद्योगपती करणार असतील तर ते चांगलेच आहे. असे देखिल म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com