Sanjay Raut : अजित पवारांच्या 'त्या' विधानावरून संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल, म्हणाले "सरकार सोडा...."
थोडक्यात
महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
राज्यातील लाखो शेतकरी संकटात सापडले असून, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अपुरी असल्याचे व्यक्त केले जात आहे.
ही पाहणी दौऱ्याला विरोधी पक्षाकडून ‘दिखावा’असा आरोप केला जात आहे.
Sanjay Raut On Ajit Pawar Statment : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील लाखो शेतकरी संकटात सापडले असून, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अपुरी असल्याचे व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या पाहणी दौऱ्याला विरोधी पक्षाकडून ‘दिखावा’असा आरोप केला जात आहे.
धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी "सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही" असे वक्तव्य केले होते. या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी पवारांवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "पैशाचं सोंग आणता येत नाही, तर मग सरकार का चालवताय? या दरोडीखोरीमुळेच शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे," असा घणाघात राऊतांनी केला.
राऊतांनी महायुती सरकारच्या दौऱ्यालाही प्रश्नचिन्ह लावले. ते म्हणाले, "मराठवाड्यातील पाहणी दौरा फक्त फोटोसेशनपुरता मर्यादित आहे. 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, पण त्यांच्या आक्रोशाला न्याय मिळाला आहे का? मदत गुप्त असायला हवी, बॉटलवर फोटो लावून मदत होत नाही."
राऊतांनी केंद्र सरकारलाही जबाबदार धरले. "महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने नेमकं काय केलं? कोणतं पथक मदतीसाठी पाठवलं? शासन मुर्दाड झालंय," असा आरोप करत त्यांनी केंद्राच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केले. भाजपवरही निशाणा साधत राऊत म्हणाले, "कोरोनाकाळात आम्ही आमदार-खासदार एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलं. पण भाजपनं पैसे पीएम केअर फंडमध्ये टाकले. शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, मात्र निवडणुकांसाठी निधी उपलब्ध आहे," अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.