Sanjay Rauat X post : "सलाईन लावलेल्या हातातही लेखणी..." राऊतांची पोस्ट 'ही' पाहून डोळ्यात पाणी
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र आज त्यांनी रुग्णालयातून एक फोटो शेअर करत समर्थकांना आश्वस्त केले आहे.
या फोटोत संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातावर सलाईन लावलेले असूनही ते पेपर आणि पेन हातात घेऊन काहीतरी लिहित असल्याचे दिसते. या पेपरवर ‘Edit’ असे लिहिले असल्याने ते सामना चा अग्रलेख लिहित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे, “हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता!” या शब्दांनी त्यांनी आपल्या लेखणीवरील अढळ श्रद्धा दाखवून दिली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या कार्यात रुजू होतील.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रकही प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला आहे. उपचार सुरू असून मी लवकरच यातून बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला काही दिवस गर्दीपासून दूर राहावे लागेल. मात्र नवीन वर्षात ठणठणीत बरा होऊन पुन्हा भेटीन.”
त्यांच्या या संदेशानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहत्यांसह पक्षातील सहकाऱ्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलाईन लावलेल्या हातातही पेन धरून लिहिणाऱ्या संजय राऊतांच्या या फोटोने त्यांच्या निष्ठेची आणि जिद्दीची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

