Air Pollution : भारतात वायूप्रदूषणामुळे मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर! 2023 मध्ये तब्बल 20 लाख जीव गमावले, तर 2026 पर्यंत...
हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनच्या ताज्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025’ या अहवालात भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे आणि मृत्यूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच त्यांनी अस देखील सांगितलं आहे की, भारतात वायू प्रदूषणामुळे प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे सरासरी 186 मृत्यू होतात, तर विकसित देशांमध्ये हा दर फक्त 17 इतका आहे.
दिवाळीपुर्वी दिल्लीचा AQI 350 च्या पुढे गेला आहे, जो "गंभीर" श्रेणीत येतो. दिवाळीनंतर, दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळी गाठली आहे. अनेक भागात, हवा इतकी प्रदूषित आहे की मॉनिटरिंग स्टेशन्सनी "अत्यंत खराब" ते "धोकादायक" पर्यंतची पातळी नोंदवली आहे. तर मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनलंय. मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर पोहोचलाय.सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण असतानाच सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवली गेली.
अशातच स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 या अहवालानुसार, देशात 2023 ला 20 लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे झालेल्या आजाराने झाला होता. ही संख्या 2000 वर्षाच्या तुलनेत तब्बल 43 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 89 टक्के नागरिक हे हृदयरोग, स्ट्रोक, फुप्फुसांचे आजार आणि मधुमेह या गैर-संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही राज्ये प्रदूषणजन्य आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू नोंदवणाऱ्या राज्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. प्रदूषणजन्य आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू या राज्यांमध्ये होतात.

