Ladki Bahin Yojana : सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेत धक्कादायक उघड: दहा हजार महिलांचा ठावठिकाणा नाही
थोडक्यात
लाडकी बहिण योजनेमध्ये एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो.
मात्र प्रत्यक्षात हजारो महिलांनी हे निकष डावलून अर्ज केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात अनेक अनियमितता उघडकीस आल्या आहेत. या योजनेसाठी ठरवलेल्या नियमांनुसार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो. मात्र प्रत्यक्षात हजारो महिलांनी हे निकष डावलून अर्ज केले. काही कुटुंबांत तीन ते चार महिलांनी अर्ज सादर केल्याचे आढळले असून, पडताळणीनंतर अशा अर्जदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अहवालानुसार एकूण ८३,७२२ महिला पात्र ठरल्या, तर १४,००० अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे तब्बल १०,००० महिलांचा दिलेल्या पत्त्यावर ठावठिकाणा सापडला नाही. त्यांनी अर्ज करताना चुकीचे पत्ते नमूद केले होते किंवा प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी राहत नसल्याचे समोर आले. राज्यभरातील आकडेवारी पाहता अशा महिलांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय, आधार क्रमांक चुकीचा टाकल्यामुळेही मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक लाभार्थिनींचे पैसे चुकीच्या खात्यांमध्ये जमा झाले, तर काही पात्र महिलांना एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे चुकीने जमा झालेले लाभ वसूल करून योग्य खात्यात कसा वर्ग करायचा, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
तरीदेखील शासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांच्या नावावर स्वतंत्र रेशनकार्ड आहे अशा विवाहित मुली किंवा सुना यांना लाभ मिळत राहील. पात्र महिलांचा हक्काचा लाभ कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे सांगून सरकारने महिलांना दिलासा दिला आहे.