Chhatrapati Sambhajinagar : अखेर सिद्धार्थ उद्यान आजपासून खुले; 'त्या' दुर्घटनेनंतर दीड महिना होते बंद
छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महापालिकेच्या अधिपत्याखालील सिद्धार्थ उद्यान आजपासून (29 जुलै) पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मागील दीड महिन्यापासून उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले होते.
साधारण 11 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या डोमसह भिंत कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उद्यानातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत उद्यान नागरिकांसाठी बंद केले होते.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विकासकाला धोकादायक डोम त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र विकासकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महापालिकेने स्वःखर्चातून धोकादायक डोम व प्रवेशद्वार हटवले. त्यानंतरच उद्यान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उद्यान बंद असल्यामुळे महापालिकेला दर महिन्याला तब्बल 35 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे हे नुकसान थांबवण्यासाठी आणि नागरिकांची उद्यानासाठी होणारी प्रतीक्षा संपवण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने उद्यानाच्या दर्शनी भागातील 22 दुकाने अद्याप बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी उद्यानात प्रवेश करताना सुरक्षा सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.
प्राणिप्रेमी, व्यायामप्रेमी आणि कुटुंबांसाठी एक हक्काचे ठिकाण असलेले सिद्धार्थ उद्यान पुन्हा सुरू होत असल्याने शहरात समाधानाचे वातावरण आहे.