Side effects of summer : उष्णतेचा परिणाम ;नवजात बाळांच्या वजनात घट, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता!

Side effects of summer : उष्णतेचा परिणाम ;नवजात बाळांच्या वजनात घट, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता!

नवजात बाळांचे वजन घट: उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे नवजात बाळांच्या वजनात घट, तज्ज्ञांची चिंता!
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तापमानाने उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ४१ अंश सेल्सिअसच्या तापमान पुढे गेलेले असल्याने नागरिकांचे जीव मेटाकुटीला आणत आहे. मात्र या वाढत्या उष्णतेचा एक गंभीर परिणाम नवजात बालकांवरही दिसून येत आहे. विविध सरकारी व खासगी रुग्णालयांतील आकडेवारीनुसार, नवजात बाळांच्या जन्मावेळी वजनात लक्षणीय घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णालयात जन्म घेणाऱ्या बाळांपैकी अनेकांची जन्मवेळीची वजनमर्यादा २.५ किलो पेक्षा कमी आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. विशेषतः एप्रिल ते जून या कालावधीत हे प्रमाण अधिक वाढते आहे. उष्णतेच्या लाटेमुळे गर्भवती महिलांमध्ये पाणी कमी होणे (डिहायड्रेशन), चक्कर येणे, अपचन, अशक्तपणा यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. यामुळे गर्भातील बाळाला आवश्यक पोषण पोहोचत नाही आणि त्याचा थेट परिणाम बाळाच्या वजनावर होतो.

स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की...

"अनेक गर्भवती महिला उन्हाळ्यात भूक मंदावल्याने आहार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी गर्भातील बाळाची वाढ अपेक्षित वेगाने होत नाही. त्यामुळे बाळाचे वजन जन्मावेळी कमी असण्याची शक्यता अधिक असते."

जन्मावेळी २.५ किलोपेक्षा कमी असलेली बाळं ही ‘लो बर्थ वेट’च्या श्रेणीत येतात. अशी बाळं तापमानात बदल, संसर्ग, पचनाच्या समस्या, वाढीचा वेग कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे यासारख्या अनेक आरोग्य समस्यांना अधिक बळी पडतात. ग्रामीण रुग्णालयांमध्ये अन्न व पोषणाच्या कमतरतेमुळे व कमी सुविधा असलेल्या ठिकाणी ही स्थिती अधिक बिकट आहे. वाऱ्याची व्यवस्था नसल्याने, उष्माघात, अंगात उष्णता साचणे आणि आईच्या थकव्यामुळे बाळावर परिणाम होतो.

आईंसाठी उन्हाळ्यातील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे,विशेषज्ञांच्या मते, गर्भवती महिलांनी उन्हाळ्यात खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

* दररोज पुरेसे पाणी (किमान ३ लिटर) प्यावे

* फळं, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यासारखे नैसर्गिक द्रवपदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत

* जड, तळलेले व मसालेदार पदार्थ टाळावेत

* थेट उन्हात फिरणे शक्यतो टाळावे

* नियमित आरोग्य तपासणी करून बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवावे

सरकार व आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्त्वाची:

महिला व बालकल्याण विभाग, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य कर्मचारी यांनी उन्हाळ्यात गर्भवती महिलांपर्यंत पोहोचावे. त्याचप्रमाणे त्यांना योग्य पोषण, पाणी व आरोग्य सुविधा देणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जनजागृती मोहिमा हाच एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. उन्हाळ्याचा परिणाम केवळ बाह्य शरीरावर होत नाही, तर गर्भातील नवजात जीवावरसुद्धा होतो. काळजीपूर्वक आहार, पाणी आणि विश्रांती या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास नवजात बाळांचं वजन सुरळीत राखता येऊ शकतं. या बाबतीत समाज, सरकार आणि कुटुंब यांचं एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com