Narayan Rane : कोकणच्या बालेकिल्ल्यातून नारायण राणेंचे राजकीय निवृत्तीचे संकेत?
कोकण हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. अनेक मोठ्या नेत्यांची कारकीर्द घडवणारा आणि राजकीय उलथापालथींचा साक्षीदार राहिलेला हा प्रदेश म्हणजे नारायण राणेंचा बालेकिल्ला. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे झालेल्या एका जाहीर सभेत नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राणेंनी थेट राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचं म्हटलं जात असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे समर्थकांपासून विरोधकांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नगरपंचायत निवडणुकीनंतर नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले होते. यावेळी भाजप आणि शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. जल्लोष, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनाने कणकवलीतील वातावरण भारावून गेलं होतं. याच सभेत उपस्थितांना संबोधित करताना राणेंनी आपल्या भाषणाचा रोख अचानक वैयक्तिक आणि भावनिक दिशेने वळवला.
“आपण आता ठरवलंय, आता घरी बसायचं,” असं म्हणत राणेंनी जणू सक्रिय राजकारणातून माघार घेण्याचे संकेत दिले. त्यांनी आपल्या साधेपणाचा उल्लेख करत सांगितलं की, “नारायण राणे आजही रस्त्यावर भाजी घेतो. माझ्या गाडीला काळी काच नाही. हातात अंगठ्या आणि काळी काच असणाऱ्या गाड्यांतून फिरणं माझा स्वभाव नाही. माणुसकीच माझा धर्म आहे.” राजकारणातील कटकारस्थानांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, पूर्वीही अडचणी आल्या आणि आजही येतात, पण यावर आता अधिक बोलायचं नाही.
राणेंनी आपल्या मुलांबाबतही भावनिक वक्तव्य केलं. “मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे, चांगलं ते जोपासा,” असं म्हणत त्यांनी निलेश आणि नितेश राणे यांच्याकडे पुढील विकासाची जबाबदारी सोपवण्याचे संकेत दिले. “माझ्यानंतर विकासात्मक काम निलेश आणि नितेश करतील. त्यांच्या हाकेला ओ द्या,” असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
लोकसभेत मिळालेल्या विजयाबद्दल आणि सिंधुदुर्गातील जनतेच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना राणेंनी द्वेष, रोष आणि स्वार्थाच्या राजकारणाला थारा देऊ नका, पक्ष सांभाळा, असं महत्त्वाचं संदेश दिला. जाहीर सभेत राणेंच्या या वक्तव्यामुळे आता ते खरोखरच सक्रिय राजकारणातून काढता पाय घेतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकृत घोषणा नसली तरी, राणेंचं वक्तव्य राजकीय निवृत्तीच्या दिशेनेच इशारा करत असल्याचं अनेकांना वाटत आहे.
