Ajit Pawar Funeral : …तर अपघात टळला असता? अजित पवारांच्या मृत्यूनंतर धावपट्टीवरील त्रुटी उघड

Ajit Pawar Funeral : …तर अपघात टळला असता? अजित पवारांच्या मृत्यूनंतर धावपट्टीवरील त्रुटी उघड

अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अखेरच्या निरोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील व राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच बारामतीत कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांचा जनसागर उसळला असून संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताबाबत तपासात हळूहळू काही प्राथमिक बाबी समोर येत आहेत. प्राथमिक अहवालानुसार, बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती. धुक्यामुळे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज घेणे कठीण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लँडिंगचा निर्णय किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणती चूक निर्णायक ठरली, याचा शोध आता सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर बारामती विमानतळावरील पायाभूत सुविधांवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे विमानतळ प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ‘अनियंत्रित’ (Uncontrolled) विमानतळ असल्याने येथे अत्याधुनिक हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली उपलब्ध नाही. मोठ्या व्यावसायिक विमानांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक तांत्रिक सुविधा येथे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विशेषतः, या विमानतळावर ‘नाईट लँडिंग’साठी आवश्यक असणारी पूर्ण क्षमतेची प्रकाशयोजना उपलब्ध नाही. धावपट्टीवर पुरेसे दिवे नसल्यामुळे कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लँडिंग करणे धोकादायक ठरू शकते. तसेच ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) किंवा ‘प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ (PAPI) सारख्या नेव्हिगेशनल साधनांचा अभावही या दुर्घटनेत कारणीभूत ठरला असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, ब्लॅक बॉक्समधून मिळणाऱ्या माहितीवरूनच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, “जर अद्ययावत तांत्रिक सुविधा आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध असती, तर कदाचित हा अपघात टाळता आला असता,” अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com