Anjali Damania On Nitin Gadkari : "गडकरींनी टोलमधला पैसा मुलांच्या...?" अंजली दमानिया यांचा आरोप
Anjali Damania On Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. 25 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दमानिया यांनी केलेल्या या आरोपांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नितीन गडकरी हे त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे ओळखले जातात. त्यांच्या खात्यातील प्रत्येक कामाची माहिती त्यांना तोंडपाठ असते. त्यांना ‘एक्स्प्रेस वे मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख मिळाली आहे. परंतु हेच गडकरी भ्रष्टाचारात गुंतले असून रस्ते आणि टोलमधून मिळणारा पैसा त्यांच्या कुटुंबाच्या कंपन्यांकडे वळवला जात असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, “गडकरींनी लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. रस्ते आणि टोलच्या माध्यमातून मिळालेला पैसा आयडीएल (IDL) नावाच्या कंपनीत जमा करण्यात आला. याच कंपनीतून हा पैसा नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीत पाठवला गेला.” तसेच “गडकरी प्रत्येक किलोमीटरमागे पैसे खात आहेत. टोलमधून मिळालेला पैसा लोकांच्या खिशात न जाता थेट गडकरींच्या फायद्यासाठी वापरला जात आहे,” असा गंभीर दावा त्यांनी केला.
याआधी 24 सप्टेंबर रोजी अंजली दमानिया यांनी समाजमाध्यम X वर ट्विट करत गडकरींविरुद्ध पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, “महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर आहे. अशा वेळी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी पत्रकार परिषद 25 सप्टेंबरला घेईन.” त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये दमानिया यांनी “मी गडकरींची पोलखोल करणार आहे. त्यांच्या सर्व कुकर्मांची मालिका सुरू करणार आहे,” असा इशाराही दिला होता. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांनी काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.