Manoj Jarange Protest - Mumbai Traffic Update : मंत्रालय-CSMTकडे जाणाऱ्या मार्गांवर चक्काजाम! मराठा आंदोलकांमुळे मुंबईत ट्रॅफिकचा खोळंबा;पोलीस अलर्ट मोडवर

Manoj Jarange Protest - Mumbai Traffic Update : मंत्रालय-CSMTकडे जाणाऱ्या मार्गांवर चक्काजाम! मराठा आंदोलकांमुळे मुंबईत ट्रॅफिकचा खोळंबा;पोलीस अलर्ट मोडवर

मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरु झाले असून सीएसएमटीकडे जाणारे काही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आझाद मैदानावर चौथ्या दिवशीही सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेत अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसर व सीएसएमटीकडे जाणारे काही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी चाकरमान्यांच्या प्रवासाच्या वेळेत आंदोलकांच्या गर्दीमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला. ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचणे कठीण झाले असून, सामान्य मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी युद्धपातळीवर कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वाहनांना पर्यायी मार्ग दाखवणे, रस्त्यांचे वळवून देणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

वाहतूक कोंडीची परिस्थिती विशेषतः काही महत्त्वाच्या मार्गांवर तीव्र आहे. सायन–पनवेल हायवेवर वाशी टोल नाका परिसरात मोठी गर्दी झाली आहे. वाशी ते मानखुर्द या पट्ट्यातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे दरम्यान वाकोला, विलेपार्ले आणि अंधेरी परिसरात प्रचंड कोंडी दिसत आहे. तसेच सांताक्रुझ-वाकोला उड्डाणपूलावर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे ठप्प झाला आहे.

याउलट, काही मार्गांवर वाहतूक तुलनेने सुरळीत सुरू आहे. पूर्वेकडील ईस्टर्न फ्रीवेवर सध्या प्रवास सुरळीत असून, खासगी वाहने आणि आंदोलकांच्या गाड्यांनाही प्रवेश दिला जात आहे. मात्र ऑफिसच्या वेळा सुरू झाल्यावर गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटल सेतूवरही वाहतूक सुरळीत असल्याचे समोर आले आहे.

सरकार व आंदोलक यांच्यात तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी चिघळू शकते. त्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनासमोर वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com