Beed Crime : महाराष्ट्र हादरला! पुण्यानंतर आता बीडमध्ये हुंडाबळीने घेतला जीव
थोडक्यात
बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी
नवविवाहितेचा सासरच्या लोकांकडून वारंवार जाच
विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह
गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील घटना
सोनाली वनवेच्या शरिरावर आढळल्या अनेक जखमा
वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजे असताना बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई तालुक्यात राजुरी मळा येथली सोनाली बाळू वनवे हिचा हुंडाबळी प्राण घेतला आहे. सोनाली बाळू आणि अनिकेत गर्जे यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या लोकांनी माहेरच्यांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली होती. तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. मुलीच्या संसारासाठी सोनालीच्या माहेरच्यांनी पाच लाख रुपये नेऊन दिले. दरम्यान आता तू आवडत नाहीस, मला तुझ्या सोबत राहायचे नाही असा वाद घालत नवऱ्यासह सासरच्या लोकांकडून वारंवार त्रास दिला होता.
याबाबतची माहिती सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना दिली होती पण त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासु प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.