Maharashtra Local Body Election Result : भगूरमध्ये सत्तांतराची ठिणगी; २५ वर्षांची शिवसेनेची सत्ता कोसळली, अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेच्या उंबरठ्यावर

Maharashtra Local Body Election Result : भगूरमध्ये सत्तांतराची ठिणगी; २५ वर्षांची शिवसेनेची सत्ता कोसळली, अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेच्या उंबरठ्यावर

तब्बल २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास टाकला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भगूर नगरपरिषदेच्या निकालाने नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. तब्बल २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास टाकला आहे. मतमोजणीला सुरुवात होताच राष्ट्रवादीने आघाडी घेतली आणि विजयाची दिशा पहिल्याच फेऱ्यांमध्ये स्पष्ट झाली.

सध्याच्या निकालानुसार भगूर नगरपरिषदेत एकूण २० जागांपैकी १७ जागांवर अजित पवार गट आणि भाजप युतीने वर्चस्व मिळवलं आहे. तर शिवसेना (शिंदे गट) केवळ ३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निकालामुळे भगूरमधील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली असून, दीर्घकाळ टिकून असलेली सत्ता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या फरकाने ढासळली आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निर्णायक आघाडीवर होते. प्रेरणा बलकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवत या सत्तांतराचं नेतृत्व केलं. विशेष म्हणजे या विजयाला भाजपचा पाठिंबा लाभल्याने महायुतीची ताकद भगूरमध्ये ठळकपणे दिसून आली. पहिल्या काही फेऱ्यांतच राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांनी विजय निश्चित केल्याने शिवसेनेची चिंता वाढत गेली आणि शेवटी पराभव स्पष्ट झाला.

भगूर नगरपरिषदेत गेल्या अडीच दशकांपासून शिवसेनेची सत्ता होती. स्थानिक पातळीवर शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भगूरमध्ये यंदा मतदारांनी बदलाचा कौल दिला. अजित पवार यांच्या नेतृत्वावर आणि राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर मतदारांनी विश्वास दाखवला. त्यामुळे हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांमध्येही चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. पिंपळगाव बसवंत येथे भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर आहेत. सिन्नरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले आघाडीवर असून राष्ट्रवादीचा प्रभाव तिथेही वाढताना दिसतोय. ओझर नगरपरिषदेत भाजपच्या अनिता घेगडमल, त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे कैलास घुले आघाडीवर आहेत. तर इगतपुरी येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर आहेत.

एकूणच, भगूरचा निकाल हा नाशिक जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरतो आहे. अजित पवार गटासाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा असून, शिवसेनेसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आणणारा आहे. आता या सत्तांतराचे पडसाद आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात किती दूरवर उमटतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com