योगींच्या युपीत क्रीडापटूंची दैना! चक्क शौचालयात दिलं जेवण

योगींच्या युपीत क्रीडापटूंची दैना! चक्क शौचालयात दिलं जेवण

खेळाडूंना दिले निकृष्ट दर्जाचे जेवण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशामध्ये कबड्डीपटूंना चक्क शौचालयात जेवण देण्यात आले आहे. सहारनपूर (यूपी) येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यातही कडधान्य, भाजीपाला, तांदूळ कच्चा असून जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर क्रीडाप्रेमी नाराज झाले असून संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय अ‍ॅक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहारनपूरला उत्तर प्रदेश क्रीडा संचालनालयाच्या अंतर्गत यूपी कबड्डी असोसिएशनद्वारे राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली. डॉ.भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 17 विभागातील संघ व एका क्रीडा वसतिगृहाने सहभाग घेतला. खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्येच होती.

स्टेडियममधील जेवण स्विमिंग पूलच्या आवारात तयार करण्यात आले होते. त्याचवेळी बाहेर विटांची चूल करून अन्न तयार केले जात होते. जेवण तयार केल्यानंतर ते टॉयलेटमध्ये ठेवण्यात आले होते. टॉयलेटच्या फरशीवर तांदळाचे मोठे पराठे आणि पुर्‍या कागदावर ठेवल्या होत्या. त्यातही भात कच्चाच देण्यात आला. यामुळे तो अनेक खेळाडूंनी खाण्यास नकार दिला. यानंतर टेबलवरून तांदूळ काढण्यात आला. अशा परिस्थितीत टेबलावर फक्त बटाट्याची भाजी, मसूर आणि रायता उरला होता. अनेक खेळाडूंना भाकरीही मिळाली नाही. खेळाडू भाजी आणि कोशिंबिरीने पोट भरताना दिसत होते. दुर्गंधीमुळे शौचालयामध्ये उभे राहणेही कठीण होत असल्याचे मुलींकडून सांगितले आहे.

यावर क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांनी म्हंटले की, स्टेडियममध्ये बांधकाम सुरू आहे. यामुळे येथे जागा उपलब्ध नव्हती. उघड्यावर अन्न तयार केले जात होते. पावसामुळे शौचालयात अन्नपदार्थ ठेवण्यात आले होते. तांदूळही निकृष्ट दर्जाचा असल्याने परत करण्यात आला. व नवीन मागविण्यात आला, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन १६ आणि १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यात खराब व्यवस्थेच्या तक्रारी आल्या होत्या. यातील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आणि संबंधित व्यक्ती तीन दिवसांत अहवाल सादर करतील. आम्ही त्याची सविस्तर तपासणी करून योग्य ती कारवाई करू, अशी माहिती सहारनपूरचे जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिंह यांनी दिली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com