MSRTC Bus : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा पगार आगाऊ मिळणार
MSRTC Employees Will Also Get Their Salaries In Advance This Month : महाराष्ट्रातील लाखो एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा पगार आगाऊ मिळणार आहे. 26 ऑगस्ट रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार असल्याचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात सणाचा आनंद दुपटीने वाढणार आहे.
गेल्या आठवड्यातच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 1 सप्टेंबरऐवजी 26 ऑगस्टलाच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तसाच निर्णय घेण्याची मागणी होत होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात पुढाकार घेत वित्त विभागाशी चर्चा केली. अखेर, जुलै महिन्यातील सवलतमूल्यापोटी प्रतिपूर्ती म्हणून राज्य शासनाने तब्बल 477 कोटी रुपये एसटी महामंडळाला वर्ग केले असून त्यातून कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे.
सामान्यतः एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 7 ते 10 तारखेच्या दरम्यान वेतन मिळते. मात्र, या महिन्यात गणेशोत्सव लक्षात घेऊन पगार लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाप्पाच्या आगमनाआधीच दिलासा मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळावे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात साजरा होणारा सण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचण नको म्हणून पगार आगाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला.”
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घराघरात गणेशोत्सवाची तयारी आता अधिक उत्साहाने होईल. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांनाही वेतन आगाऊ मिळाल्याने “बाप्पा पावला” असा आनंददायी माहोल सर्वत्र आहे.