Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या
पंढरपूरमधील आषाढी एकादशी वारीसाठी राज्य परिवहन मंडळाने 5200 हून अधिक विशेष गाड्यांची सोय केली. वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने विविध विभागातून वारीसाठी अधिकच्या गाड्या सोडल्या आहेत. तसेच, प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये तात्पुरती बस स्थानके उभारण्यात आली आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने विठ्ठलभक्त आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होतात. विठूरायाच्या भक्तांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा यासाठी यावर्षी एसटी महामंडळाकडून अधिकच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने तब्बल 5200 हून अधिक गाड्यांची व्यवस्था केली आहे. वारीमधील वारकरांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना येथे तात्पुरती बस स्थानके उभारली आहेत. 40 पेक्षा जास्त प्रवाशांची संख्या असल्यास, त्यांच्या गावाहून थेट पंढरपूरसाठी विशेष बसही उपलब्ध करून दिली आहे.
या वारीच्या काळात विशेष बससाठी स्वतंत्र ड्राइवर आणि कंडक्टर यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या जेवणाची, राहण्याची आणि चहापाण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाविकांना परतीचा प्रवास करायचा असल्यास 7 तारखेला या एसटी बसची सुविधा उपलब्ध असणार आहे. इतकेच नव्हे तर एसटीच्या डेपोमधील जवळजवळ 20 हजार ड्राइवर आणि कंडक्टर यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.