MSRTC : दिवाळीपूर्वी एसटी आरक्षण प्रणाली कोलमडली; प्रवासी व कर्मचारी हैराण
दिवाळीसारख्या गर्दीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आरक्षण प्रणाली ठप्प झाली आहे. परिणामी, गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नवीन आरक्षण सॉफ्टवेअर सिस्टिममुळे ही अडचण निर्माण झाली असून, कर्मचारीही या प्रणालीमुळे वैतागले आहेत. महामंडळाने दोन वर्षांपूर्वी जुनी आरक्षण प्रणाली बदलून नवीन सॉफ्टवेअर लागू केलं. मात्र ही प्रणाली अधिक किचकट आणि वेळखाऊ ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिवाळीच्या मोक्याच्या काळात आरक्षण सिस्टीम पूर्णपणे बंद पडल्याने, ना प्रवाशांना तिकीट मिळतंय, ना कर्मचाऱ्यांना काम करणे सोपं जात आहे.
नवीन प्रणालीमुळे खर्चातही वाढ
पूर्वी एका गाडीच्या आरक्षणासाठी एकच कागद पुरेसा असायचा. मात्र, सध्याच्या सिस्टिममध्ये एका मेमोसाठी तीन प्रिंट काढाव्या लागतात. यामुळे कागदाचा वापर वाढून महामंडळाचा खर्चही अनावश्यकरीत्या वाढतो आहे.
कर्मचारी नाराज
काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आधीची सिस्टिम खूप सोपी होती. मात्र, सध्याची आरक्षण प्रणाली अतिशय गुंतागुंतीची असून, काम करताना अनेक अडचणी येतात.
सरकारकडून आर्थिक मदत
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ६ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. यासोबतच १२ हजार रुपयांची उचल आणि एकूण २२०० कोटींची रक्कम ४८ हप्त्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात कपात
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देत ‘आवडेल तिथे प्रवास’ या पासच्या दरात २० ते २५ टक्के कपात करण्यात आली आहे. या योजनेत एकाच पासवर राज्यभर अमर्याद एसटी प्रवास करता येतो.
दिवाळीच्या काळात एसटीच्या आरक्षण सिस्टीमने पूर्णपणे ब्रेक घेतल्याने प्रवासी आणि कर्मचारी दोघेही अडचणीत सापडले आहेत. प्रणालीचा पुनर्विचार आणि सुधारणा ही आता वेळेची गरज आहे.