Kunal Kamra : कुणाल कामराचे Bookmyshow ला पत्र, लिहिले, "तुम्हाला एकच विनंती..."
कॉमेडियन कुणाल कामरा सध्या खूप चर्चेत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्याला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. त्याचप्रमाणे कुणालने उच्च न्यायालयात धाव घेतली असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणीदेखील केली आहे. मागणी रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. मात्र आता मात्र कुणाल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कुणालने बुक माय शोला पत्र लिहिले आहे.
कुणालने पत्रांमध्ये लिहिले आहे की, "मी समजू शकतो की BookMyShow ला राज्य सरकारशी सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे मी हे देखील जाणून आहे की मुंबई हे मनोरंजनसाठीचं मोठं केंद्र आहे. राज्य सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय गन्स अँड रोझेस किंवा कोल्ड प्ले यांसारखे आयकॉनिक शोज तिथे होणार नाहीत. तुम्ही मला डिलिस्ट केलं आहे हा मुद्दा नाही. कलाकारांच्या कार्यक्रमांची यादी करणं, ती पोस्ट करणं हा तुमचा अधिकार आहे".
पुढे लिहिले की, "मात्र 2017 ते 2025 या कालावधीत मी सादर केलेल्या कार्यक्रमांची यादी वेबसाईटवर टाकायची नाही हे नाकारुन मला प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यातच रोखण्यात आलं आहे. लिस्टिंग शोजसाठी तुम्ही 10 टक्के रक्कम घेता. ते तुमचं बिझनेस मॉडेल आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे एखादा कॉमेडियन मोठा असो वा लहान त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी दिवसाला त्याला साधारण 6 ते 10 हजार रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च एखाद्या अतिरिक्त बोजाप्रमाणे आहे, मात्र कलाकारांना तो खर्च सहन करावा लागतो".
पुढे त्याने लिहिले की, "माझी तुम्हाला एकच विनंती आहे आणि ती काही कठीण नाही. मला माझ्या प्रेक्षकांची संपर्क सूची पुरवा, माझ्या सोलो शोजमध्ये हे प्रेक्षक होते त्यांची माहिती मला हवी आहे. एखाद्या ठिकाणी मी 30 कलाकारांसह पुण्यात वगैरे कॉमेडी शो केला तर तो त्या शोचा सामूहिक डेटा समजला जाईल. मात्र मी सोलो शोबाबत तुम्हाला विनंती करतो आहे".
कारण त्या शोजना आलेले प्रेक्षक हे माझे प्रेक्षक आहेत. मला डिलिस्ट करण्याचा अधिकार तुमचा आहे तसा माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच अधिकार मला आहे. शिवाय एक विनंती आणखी आहे की मला डिलिस्ट करु नका किंवा मला माझ्या प्रेक्षकांची संपर्क सूची द्या ही तुम्हाला नम्र विनंती आहे". असं म्हणत कुणाल कामराने ही पोस्ट लिहिली आहे.