State Election Commission : मतदार यादी अद्यतनासाठी, राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय आयोगाला वेळ मागितला
थोडक्यात
मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत द्या
राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती
राज्य निवडणूक आयोगाच्या या विनंतीच्या पत्राला दोन आठवडे उलटून गेले
राज्यात लवकरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग यासाठी तयारी देखील करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानंतर निवडणूक आयोग कामाला लागले आहे. मात्र या मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत द्या अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय आयोगाला पत्र लिहून केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती
राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर मतदार याद्यांचा घोळ केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि मनसेकडून केला जात आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार याद्यांतून दुबार नावं वगळण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र या प्रक्रीयेला लागणारा वेळ पाहता. 15 ऑक्टोबरपर्यंत नव्या मतदारांची नोंदणी आणि मतदार याद्यांतून दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी मुदत द्या अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय आयोगाला पत्र लिहून केली आहे.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या या विनंतीच्या पत्राला दोन आठवडे उलटून गेले आहेत. अद्याप देखील केंद्रीय निवडणूक आयोगाचं त्याला कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे मतदार याद्या अद्ययावतीकरण कधी होणार? त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी घेतल्या जाणार? असे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे राज ठाकरे हे देखील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. असं म्हणत आक्रमक झालेले आहेत.
