Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’ पुणे जमीन व्यवहार घोटाळ्याबाबत बावनकुळे मोठं वक्तव्य

पुणे जमीन व्यवहार घोटाळ्याबाबत राज्य सरकारने गंभीर भूमिका घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती महिनाभरात अहवाल सादर करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • पुणे जमीन व्यवहार घोटाळ्याबाबत राज्य सरकारने गंभीर भूमिका घेतली.

  • चौकशी करण्यासाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती महिनाभरात अहवाल सादर करणार

  • माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुणे जमीन व्यवहार घोटाळ्याबाबत राज्य सरकारने गंभीर भूमिका घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती महिनाभरात अहवाल सादर करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. “या चौकशीनंतर दोषींवर सरकार कठोर कारवाई करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले, “या प्रकरणात ज्यांनी नोंदणी केली, विक्रीखरेदी केली किंवा कागदोपत्र व्यवहारात भाग घेतला आहे, अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाने विकस खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, यात आयजीआर, सेटलमेंट कमिशनर, महसूल सचिव आणि विभागीय आयुक्त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही मजबूत समिती संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून अहवाल देईल.” त्यांनी स्पष्ट केलं की, अशा प्रकारचे व्यवहार पुन्हा होऊ नयेत यासाठी महसूल विभागात आधीपासूनच स्पष्ट कायदे आणि स्थायी आदेश आहेत. “नोंदणी अधिनियमानुसार प्रत्येक बाब स्पष्ट आहे. तरीही काही मुद्रांक अधिकारी अशा बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होत असतील, तर त्यांना नोकरीतूनच कमी केलं पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.

पुणे जमीन घोटाळ्यातील १८०० कोटी रुपयांच्या जमिनीबाबत काही कोटींमध्ये व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. यावर बावनकुळे म्हणाले, “वडेट्टीवार यांनी जर खरोखर तक्रार द्यायची असेल, तर ती लेखी स्वरूपात द्यावी. फक्त माध्यमांमधून आरोप करून उपयोग नाही. आम्हाला जर ठोस तक्रार मिळाली तर चौकशी केली जाईल. पुणे प्रकरणात कोणतीही बाह्य तक्रार नव्हती, परंतु माध्यमांच्या अहवालांवरून आम्ही स्वतःहून चौकशी सुरू केली आणि त्यावर तत्काळ कारवाईही केली.” या चौकशीत आतापर्यंत ४२ कोटी रुपयांचा महसूल वसूल करावा लागेल, असे प्राथमिक निष्कर्ष आढळले आहेत. बावनकुळे म्हणाले, “प्राथमिक स्तरावर आम्हाला जे दोष आढळले, त्यावर गुन्हे दाखल केले आहेत. समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील सर्व निर्णय सरकार घेईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चौकशीसंबंधी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”

बोपोडी परिसरातील आणखी एका संशयास्पद जमीन व्यवहाराबाबत प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “जर नागरिकांना महसूल किंवा नोंदणी खात्याशी संबंधित काही गैरव्यवहार आढळले, तर ते आम्हाला थेट तक्रार देऊ शकतात. आम्ही मंगळवार आणि बुधवार या दिवशी नागरिकांच्या तक्रारी ऐकतो. आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील, तर सरकार चौकशी करून योग्य ती कारवाई करेल.” दरम्यान, बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. “महायुतीचा लढा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झालेला आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे महायुती उमेदवार असतील, आणि जिथे नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील. कोणतेही मनभेद राहणार नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “सध्या आम्ही मेळघाट, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरडी या भागांचा दौरा करत आहोत. ५५० कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले का, याची प्रत्यक्ष पाहणी आम्ही करत आहोत.” कर्जमाफीच्या मुद्यावर विचारले असता त्यांनी सांगितले, “सरकार शेतकऱ्यांसाठी ठामपणे काम करत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा कर्जमाफी जाहीर करून शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत, याची खबरदारी सरकार घेणार आहे. पुढे जी समिती अहवाल देईल, ती खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com