Sujat Ambedkar : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा सुजात आंबेडकरांची टीका..
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा तीव्र शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुजाता आंबेडकर यांनी प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. त्यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकांतील भूमिकेवर बोट ठेवत, भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप केला.
सुजात आंबेडकर म्हणाले की, “अख्या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी नेमकं काय केलं होतं. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात घडलेल्या घटना लपून राहिलेल्या नाहीत.” त्यांनी असा आरोप केला की, एका मुस्लीम उमेदवाराचा राजकीय बळी देण्यात आला, ज्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ची संभाव्य जागा गमावली गेली आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला.
या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. सुजाता आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रणिती शिंदे जसं बोलतात, त्यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र निवडणुका संपल्यानंतर त्या कुठे जातील, हे संपूर्ण जग पाहून ठरवेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या राजकीय भविष्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
याचवेळी सुजात आंबेडकर यांनी पूर्वी केलेला दावा पुन्हा एकदा ठामपणे मांडला. “प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जातील, या माझ्या दाव्यावर मी आजही ठाम आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधकांकडून या आरोपांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
दरम्यान, या आरोपांवर काँग्रेसकडून किंवा प्रणिती शिंदे यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सुजाता आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यांचा महत्त्वाचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
