NCP Politics : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, सत्तेत बदल, दिल्लीत एन्ट्री? पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जबाबदाऱ्यांची पुनर्रचना करत सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता राजभवनात होणाऱ्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागेसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या नावाबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे वजनदार नेते—छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. या भेटीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव देण्यात आला, तसेच राष्ट्रवादीकडेच महत्त्वाची खाती ठेवण्याची मागणी करण्यात आली.
आजच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतर त्या मंत्रिमंडळात सहभागी होतील. पुढील काळात त्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली असून, लवकरच निवडणूक आयोग पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल.
यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे येत असले तरी, पक्षातील मोठा वर्ग सुनेत्रा पवार यांनाच हे पद द्यावे, अशी आग्रही भूमिका घेत आहे. पवार कुटुंबाकडेच पक्षाची सूत्रे असावीत, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पवार कुटुंब एकत्र यावे, अशी भूमिका आमदार-खासदारांकडून व्यक्त होत असून, यामध्ये शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
