Sunetra Pawar : सुनेत्रा पवार ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी शपथविधी

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी शपथविधी

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण साकार होणार असून सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण साकार होणार असून सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार असून, या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या रिक्ततेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी आघाडीसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणणारा हा निर्णय केवळ पक्षापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणारा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शपथविधी सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागील नेमकी कारणे स्पष्ट नसली तरी, यावरून पक्षातील अंतर्गत राजकारण आणि भावनिक पातळीवरील तणाव पुन्हा एकदा समोर येत असल्याचे चित्र आहे.

सुनेत्रा पवार या आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर राहिल्या असल्या, तरी सामाजिक कार्य, महिलांसाठीचे उपक्रम आणि बारामती परिसरातील विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग सातत्याने दिसून आला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या कोणती भूमिका घेतात आणि प्रशासनावर कसा ठसा उमटवतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, आजच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळात आणखी काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, हा शपथविधी केवळ एका पदाचा सोहळा नसून, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com