Border 2 Sunny Deol : देशभक्तीने भरलेलं ‘बॉर्डर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा
देशभक्तीची लाट पुन्हा एकदा सिनेमागृहात उसळणार आहे. सनी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’ प्रेक्षकांच्या मनात आजही ताजाच आहे. आता जवळपास 27 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सनी देओलने चाहत्यांना खास सरप्राईज देत ‘बॉर्डर 2’चे पहिले पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली.
जाहीर झालेल्या पोस्टरमध्ये सनी देओल सैनिकी पोशाखात, रणांगणात सर्वात पुढे उभा राहून शत्रूशी सामना करताना दिसत आहे. त्याचा हा आक्रमक लूक चाहत्यांच्या मनाला भावला आहे. पोस्टर शेअर करताना सनी देओलने लिहिले, “हिंदुस्तानसाठी पुन्हा एकदा लढूया.” त्यासोबतच त्याने सांगितले की ‘बॉर्डर 2’ 22 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
15 ऑगस्टच्या खास दिवशी रिलीज डेट जाहीर करून सनी देओलने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे आणि या दरम्यान सनी देओल सतत सोशल मीडियावरून अपडेट्स देत आहे. आता पोस्टर आणि रिलीज डेट आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
या बहुचर्चित चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मेधा राणा, मोना सिंह आणि सोनम बाजवा महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी वरुण धवनचा मिशा ठेवलेला लूक समोर आला होता, जो प्रेक्षकांना फारच भावला.
‘बॉर्डर’च्या पहिल्या भागाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आता ‘बॉर्डर 2’मधून पुन्हा एकदा देशभक्ती, सैनिकांचे साहस आणि रणांगणातील थरार मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. 22 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना देशभक्तीच्या लाटेत बुडवणार, हे नक्की.