Supriya Sule On Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे आक्रमक; सत्ताधाऱ्यांना अधिवेशन बोलवण्याची मागणी
Supriya Sule On Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर पोहोचल्या आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र प्रकृती खालावल्याने जरांगे यांनी संवाद टाळला. यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
सुळे म्हणाल्या, “जरांगे पाटलांना विकनेस आला आहे, कारण त्यांनी चार दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही. आंदोलकांचा अन्नाचा प्रश्न सुटला आहे, मात्र येथे गंभीर अस्वच्छता आहे. आंदोलकांसाठी शौचालये, पाण्याची सुविधा आणि स्वच्छता बीएमसीने करावी, अशी मी सरकारकडे मागणी करणार आहे.”
“अधिवेशन बोलवून निर्णय घ्या”
आरक्षणाच्या प्रश्नावर थेट सत्ताधाऱ्यांना उद्देशून सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्री आणि सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अधिवेशन बोलवा, बिल पास करा आणि आरक्षण द्या. आज तुमच्याकडे 250 आमदार आहेत, बहुमत आहे, त्यामुळे तुम्ही चुटकीसरशी निर्णय घेऊ शकता. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला बहुमत दिलं आहे, मग आता निर्णय घ्या.”
“आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली”
सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना सुळे म्हणाल्या, “सगळ्यांशी बोलून मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमच्यावर ढकलून काही होणार नाही. सगळे पक्ष फोडून, घरं फोडून मुख्यमंत्री झालात, आता निर्णय घ्या. सत्ता म्हणजे केवळ लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नव्हे. मायबाप जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणं म्हणजे खरं नेतृत्व.”
सुळे यांच्या या वक्तव्यामुळे आझाद मैदानावरील आंदोलनाला नवी राजकीय धार मिळाली असून, आता सरकारने यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.