Supriya Sule| वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात ED का लावली नाही?, सुप्रिया सुळेंचा सवाल
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान आज या प्रकरणावरुन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मागणी केली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांन संदर्भात आज सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात असून त्याने दहशतीच्या खाली लाखोंची मालमत्ता जमवल्याचा दावा केला जातोय. यामुळे सर्व प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सतत होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कराड याला ईडी का लावत नाही? असा सवाल सरकारला केला आहे.
सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेले प्रश्न
१) वाल्मिक कराडची जी बँक खाती गोठवण्यात आली आहेत ती किती खाती आहेत आणि त्यात किती पैसे आहेत?
२) जर खंडणीचा गुन्हा दाखल असेल तर यामध्ये ईडीचा सहभाग का नाही? नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर खंडणीचे आरोप झाले तर ईडी लावली गेली. आता वाल्मिक कराडांच्या मागे ईडीचा ससेमिरा का नाही?
३) विष्णू चाटे जे कुणी आहेत त्यांचा फोन हरवला आहे असं सांगितलं जातं आहे. असा कसा काय मोबाईल हरवला? त्याचा सीडीआर कुठे आहे?
४) ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी एकावर खुनाचा आरोप आहे तो आरोपी अजूनही फरार कसा काय? खून केलेला माणूस पोलिसांना सापडत कसा नाही?
५) वाल्मिक कराडचं व्हॉईस सॅम्पलिंग घेण्यात आलं होतं त्याचं काय झालं?
७) परळीमध्ये मंगळवारी हिंसाचार झाला तो नेमका कसा झाला? तसंच देशमुख कुटुंबाने आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढून आंदोलन करणार, तिथे पोलीस हजर होते, त्यांनी देशमुख कुटुंबाला टाकीवर चढू कसं काय दिलं?
८) परभणी आणि बीड या दोन्ही ठिकाणी ज्या घटना घडल्या त्यातील कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार?
९) सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणाचं पुढे काय झालं?