महिलांच्या सुरक्षेवरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला जाब, म्हणाल्या, "अतिशय संतापजनक
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मुक्ताई नगर भागात ही घटन घडली. याबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट लिहून सरकारला जाब विचारला आहे.
काय आहे सुप्रिया सुळेंच्या पोस्टमध्ये ?
"केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या रक्षाताई खडसे यांच्या कन्येची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची किती दुर्दशा झालीय हे या घटनेतून स्पष्ट होते. या राज्यात राहणारी प्रत्येक मुलगी सर्वप्रथम महाराष्ट्राची लेक आहे. तिच्या सन्मानाचं रक्षण करणं हे महाराष्ट्र शासनाचं आद्यकर्तव्य आहे".
पुढे त्यांनी लिहिले की, "एक आई म्हणून मी रक्षाताईंना झालेल्या वेदना समजू शकते. याप्रसंगी मी त्यांच्यासोबत उभी आहे. राज्यातील मुलींची छेड काढणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेच्या संदर्भाने महाराष्ट्राला आश्वस्त करावे"