Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या नव्या पंतप्रधान; भारतासोबतच्या नेपाळच्या संबंधांबद्दल बोलताना कार्की म्हणाल्या...
थोडक्यात
सुशीला कार्की नेपाळच्या नव्या पंतप्रधान
भारतासोबतच्या नेपाळच्या संबंधांबद्दल कार्की यांनी दिली प्रतिक्रिया
सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत पदभार स्वीकारला
(Sushila Karki) पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या अचानक राजीनाम्यानंतर नेपाळच्या नव्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर भारताशी असलेल्या नात्यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, भारताने नेहमीच नेपाळला मदत केली असून दोन देशांच्या नात्यात कधी कधी किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण लोकांमधील संबंध मात्र प्रेम आणि आपुलकीने परिपूर्ण आहेत. भारतीय मित्र मला बहिणीसारखं मानतात. भारतासोबतचे आमचे संबंध खूप चांगले आणि जुने आहेत.
कार्की यांनी सांगितले की, “मी मोदीजींना सर्वप्रथम नमस्कार करेन. त्यांनी दोन्ही देशांतील भावनिक नातेसंबंध अधोरेखित करताना नातेवाईक, परिचित आणि परस्पर सद्भावनेचा उल्लेख केला. मात्र त्यांनी धोरणात्मक मुद्द्यांबाबत लगेच भूमिका न घेता पुढील चर्चेतून दिशा ठरवली जाईल, असे स्पष्ट केले.
नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या कार्की या माजी मुख्य न्यायाधीश आहेत. बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेताना गंगा नदीकाठच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. बिराटनगर या त्यांच्या गावी भारताची सीमा जवळ असल्याने त्यांचा भारताशी नेहमीच संपर्क राहिल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण आंदोलनकर्त्यांच्या पाठिंब्याने पंतप्रधानपदी आलेल्या कार्की यांनी लोकशाही प्रक्रियेतून नवा अध्याय सुरू केला आहे. भारताशी मजबूत संबंध ठेवणे आणि लोकांमधील जुनी नाती अधिक घट्ट करणे हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य राहील, असा संदेश त्यांनी दिला.