रणजित कासलेच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, गृहमंत्रालय....
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा केला. त्यांचा याबद्दलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले यांनी सांगितले आहे. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली. सोशल माध्यमांवर देखील रणजीत कासले यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
रणजित कासलेच्या व्हायरल व्हिडिओवर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "सध्या रील स्टार्सचा धुमाकूळ सुरू आहे. रणजित कासले कोण, हे मी आठ-दहा दिवसांपूर्वी बघायचा प्रयत्न केला. पोलीस सेवेतून निलंबित झालेला एक अधिकारी असल्याचे दिसले. त्याचे सतत वेगवेगळे रील्स येत आहेत. त्यात तो वाट्टेल त्या लोकांवर वाट्टेल त्या पद्धतीने बोलत आहे. मागे एका वाहिनीच्या चांगल्या पत्रकाराबद्दल त्याने विधान केले होते. कशा गोंधळ घालणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. काय सत्यता ते नंतर पाहिलं पाहिजे. पण आधी ताब्यात घेतलं पाहिजे. मूळात ते इतकं बिनधासपणे बोलतात ते कुणामुळे, ते सत्य आहे की नाही, हे पाहणं गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. मी कायदा मानणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे कुठंतरी पुरावा असल्याशिवाय व्यक्त होणं हे माझ्या बुद्धीला पटणारं नाईए. परंतू त्याच्या बोलण्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होतेय. या स्थितीला कुठेतरी गृहमंत्रालय जबाबदार आहे. अशा लोकांना तत्काळ जायबंद घातला पाहिजे. बीडमध्ये अशा रील्सनं धुमाकूळ घातला आहे."