सुषमा अंधारेंचं चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर: 'लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही'
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत. भाजपाच्या चित्रा वाघ आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध बघायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पलटवारदेखील केला आहे. चित्रा वाघ यांचे उत्तर चांगलेच चर्चेत आले होते.
चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांना उत्तर दिले की, "माझ्या कॅरेक्टवर सतत बोलले जाते. ज्यांची जशी लायकी तसेच तो बोलणार. तुमची लायकी काय? माझ्या कुटुंबाने दोन वर्षात खूप सहन केलं. दरम्यान चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "'कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई, पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा.अत्यंत इमानी इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आले आहे. पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकाऊन जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी".
पुढे त्यांनी लिहिले की, "माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं ईमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची ही तुमची योग्यता नाही". पुढे त्यांनी #माझ्याशीनीटवागायचं असंही लिहिले आहे.