Supriya Sule : अजितदादांच्या अपघातावर संशय; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या

Supriya Sule : अजितदादांच्या अपघातावर संशय; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर मुद्दे मांडत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. हा अपघात होता की घातपात, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर मुद्दे मांडत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या प्रवासाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अजितदादांचा मूळ प्लॅन कारने जाण्याचा होता. मात्र, आदल्या रात्री वेळेचे गणित बदलून त्यांना घाईगडबीत विमानाने जाण्याचे नियोजन करण्यात आले का? विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलले?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

या आरोपांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला आहे की या सर्व प्रकरणाची सविस्तर आणि पारदर्शक चौकशी केली जाईल. रोहित पवारांची अस्वस्थता सहाजिक आहे. त्यांनी अत्यंत पारदर्शकपणे प्रश्न मांडले आहेत. आता मुख्यमंत्री चौकशी करतील असे सांगितले आहे, त्यामुळे आपण त्या चौकशीची वाट पाहू.” रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातील एका नेत्याचे नाव घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता, “त्या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

दरम्यान, कुटुंबीयांच्या भावनिक अवस्थेबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी आणि सुनेत्रा वहिनी यापूर्वीही डीपीडीसीमध्ये एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर आता नवीन जबाबदारी आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे; पण अजितदादा नसल्याचं दुःखही तितकंच मोठं आहे. अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही ते आपल्यात नाहीत, हे खरं वाटत नाही.”

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही त्यांनी माहिती दिली. “शरद पवारांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रुग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. त्यांना उद्या डिस्चार्ज मिळू शकतो,” असे त्यांनी सांगितले. शरद पवार रुग्णालयात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून तब्येतीची विचारपूस केली होती, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली. “अजितदादांनंतरच्या काळात सर्व पक्षांनी आमची साथ दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते,” असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी आता चौकशीच्या निष्कर्षाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com