Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद
राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी गणेशोत्सवाची दुहेरी आनंदवार्ता आहे. यंदा सरकारने एक मोठा निर्णय घेत ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच देण्याचा आदेश जारी केला आहे. १ सप्टेंबर रोजी मिळणारा पगार आता २६ ऑगस्टलाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा लोकसण. घराघरात बाप्पा विराजमान होत असताना कर्मचाऱ्यांना खर्चासाठी पैशांची सोय व्हावी, यासाठी सरकारने वेतन वितरणाची तारीख पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ केवळ शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांनाच नव्हे तर जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषि विद्यापीठांतील अधिकारी-कर्मचारी, तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयांच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्याचप्रमाणे निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ होईल.
शासन निर्णयानुसार, १ सप्टेंबर रोजी मिळणाऱ्या वेतनाच्या देयकासाठी असलेली तरतूद शिथिल करण्यात आली आहे. मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक ७१ तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ यांतील तरतुदींनाही तात्पुरती मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे २६ ऑगस्ट रोजी पगार, निवृत्तिवेतन आणि कुटुंब निवृत्तिवेतन अदा करण्यात येणार आहे.
यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन आणि निवृत्तीवेतनाचे देयके उपकोषागार, जिल्हा कोषागार किंवा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे तातडीने सादर करावेत, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.
या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीपासून ते घरातील इतर खर्चासाठी कर्मचाऱ्यांना वेळेत पैशांची उपलब्धता होणार आहे. पारंपरिक पद्धतीने पगार १ तारखेला खात्यात जमा होत असला तरी यंदा सरकारने "बाप्पा पावलाय" म्हणत नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे "गणेशोत्सवापूर्वी सरकारची गोड भेट" अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.