चहावाल्याकडूनच रेल्वे तिकीट कन्फर्म अन् लाखोंची कमाई ! CSMT स्थानकातील धक्कादायक प्रकार उघड
मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावटी सही शिक्क्याचा वापर करुन व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करण्याचे काम तिथेच असलेल्या चहावाल्याने केले आहे. याप्रकरणी आता दक्षता विभागाच्या निरीक्षकांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे.
ताब्यात घेतलेला चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करत असे. त्याने अधिकाऱ्यांच्या बनावटी सही शिक्के तयार केले आणि त्याचा वापर तो व्हीआयपी कोट्यातील तिकीट कन्फर्म करण्यासाठी करत असे. या कोट्या च्या वापरातून त्याने दीड ते दोन लाख रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे कँटिनमध्ये रवींद्र कुमार साहू हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करत होता. त्याने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता अशा पदांवरील अधिकाऱ्यांचे सही-शिक्का बनावट तयार करून घेतले. प्रतीक्षा यादीतील (Waiting list)तिकीट कन्फर्म करण्यासाठीच्या विनंती पत्रावर याचा वापर करून संबंधित तिकिटे तो कन्फर्म करून घेत होता अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन महिन्यांपासून व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत रोज पाच-सहा तिकिटे कन्फर्म करत असल्याचे समोर आले.प्रवाशांना कन्फर्म तिकीट देऊन त्यांच्याकडून हजारो रुपयांची कमाई करत असल्याची बाब चौकशीत उघड झाली आहे.मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांचे पथक कोलकाता मेलमधील तिकीटधारकांची तपासणी करत होते. यावेळी काही प्रवाशांनी आम्ही अधिक पैसे देऊन कन्फर्म तिकीट घेतल्याचे सांगितले.