Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधून आपले कामकाज बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. तब्बल 25 वर्षांनंतर कंपनीने पाकिस्तानमधील आपला प्रवास थांबवत, देशातील अस्थिर व्यावसायिक वातावरण आणि धोका यांना कारणीभूत ठरवत गाशा गुंडाळला आहे. मायक्रोसॉफ्टच्या पाकिस्तानमधील स्थापनेशी संबंधित असलेले संस्थापक सदस्य जव्वाद रहमान यांनीच ही माहिती उघड केल्याने, पाकिस्तानच्या तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मायक्रोसॉफ्टकडून या निर्णयाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, रहमान यांच्या पोस्टनुसार देशातील अनिश्चित आणि निराशाजनक परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांनी आपली खंत व्यक्त करताना लिहिले की, “हा निर्णय आपल्या देशानेच निर्माण केलेल्या वातावरणाचे परिणाम आहे. अशा देशात, जिथे मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्य जागतिक कंपनीलाही अस्थिरता आणि धोका वाटतो, तिथे इतर लहान कंपन्यांचे काय होईल?” रहमान यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला आहे, "अशा परिस्थितीत बदल नेमके कुठे झाले, की जिथे जागतिक कंपन्या थांबणे अशक्य झाले?"
आपल्या पोस्टमध्ये रहमान यांनी पाकिस्तानच्या आयटी मंत्री आणि सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या जागतिक आणि प्रादेशिक नेतृत्वाशी त्वरित संपर्क साधावा, जेणेकरून मायक्रोसॉफ्टला पुन्हा पाकिस्तानात थांबवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतील. मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक दिग्गज कंपनीचा पाकिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे.
यामुळे देशात नवउद्योजक, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांना जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणे अधिक कठीण होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता पाकिस्तान सरकार या परिस्थितीवर कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय केवळ एका कंपनीचा एक्झिट नसून देशातील व्यापक व्यावसायिक वातावरणातील अस्थिरतेचे आणि धोरणात्मक अपयशाचे प्रतिबिंब आहे, असे निरीक्षकांचे मत आहे.