राज्यात पसरली थंडीची लाट, थंडी आणखी वाढणार IMD ने जारी केला अलर्ट
राज्यामध्ये अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीने मुक्काम ठोकला असून घसरणाऱ्या तापमानाने शनिवारी ८.९ अंश ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली. निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात या दिवशी सात अंशांची नोंद झाली. मागील आठ वर्षांत नोव्हेंबरमधील शनिवार हा शहरातील सर्वात थंड दिवस ठरला. याआधी २०१६ मध्ये नोव्हेंबर महिन्यात ८.८ अंशाची नोंद झाली होती. हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार मागील सात वर्षांत नोव्हेंबरमधील हे सर्वात नीचांकी तापमान आहे.
थोडक्यात
राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली
IMD कडून अलर्ट, आणखी थंडी वाढणार
फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
नाशिकमध्ये तापमानाने शनिवारी ८.९ अंश ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे राज्यात आर्द्रता कमी होणार असून आणखी थंडी वाढणार आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे काही राज्यात जोरदार पावसाती शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात भागाला थंडीचा अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील थंडी वाढली आहे.
अमरावती जिल्ह्यात सध्या थंडीची लाट पसरली आहे, वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे,जिल्ह्याचा पारा 12 अंशापर्यंत खाली आला आहे. तर विदर्भाच नंदनवन असलेल्या मेळघाटात आठ ते नऊ अंशापर्यंत पारा घसरला आहे. ही थंडी हरभरा आणि गहू पिकांच्या फायद्यासाठी आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्यासाठी ही थंडी घातक असल्याचं सांगण्यात आलं आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या असून सकाळी उबदार कपडे घालून लोक घराबाहेर पडले आहेत. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.