Radhika Yadav : धक्कादायक! 'रील' बनवल्याच्या रागातून वडिलांनी घातल्या मुलीला गोळ्या; राज्यस्तरीय टेनिसपटूनं गमावला जीव
सोशल मीडिया व्हिडिओवरून झालेल्या वादातून गुरुवारी गुरुग्राम येथील राहत्या घरी 25 वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटूची तिच्या वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन गोळ्या झाडल्याचा आरोप असलेल्या तिच्या वडिलांना कुटुंबातील इतर सदस्यांच्या जबाबानंतर अटक करण्यात आली आहे. पीडित राधिका यादव असे या युवतीचे नाव असून तिने अनेक राज्यस्तरीय टेनिस स्पर्धांमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच स्थानिक क्रीडा क्षेत्रात ती एक उदयोन्मुख स्टार मानली जात होती.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना सकाळी 11.30 वाजता त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर घडली. राधिका यादवने 'रील' बनवला असून या घटनेवरून तिच्यावर गोळीबार करण्यात आला. तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राधिका यादवने सोशल मीडियासाठी शूट केलेल्या व्हिडिओ रीलवरून झालेल्या मतभेदातून तिच्या वडिलांशी तिचा वाद झाला. पोस्टमुळे संतापलेल्या वडिलांनी त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर काढले आणि गोळीबार केला.
गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार म्हणाले की, प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, सोशल मीडिया पोस्टमुळे घरात तणाव निर्माण झाला होता. "वडिलांनी संताप व्यक्त केला आणि त्यांनी तिच्यावर गोळी झाडली. वापरलेले शस्त्र परवानाधारक रिव्हॉल्व्हर होते. ते घरातून जप्त करण्यात आले आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, कुटुंबीयांनी राधिकाला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.