Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात; रस्त्यावर व्यायाम करत असताना ट्रकची धडक
गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव अज्ञात ट्रकने रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून, दोन गंभीर जखमींवर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काटली गावातील सहा युवक सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे महामार्गालगत व्यायाम करत होते. याचदरम्यान भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून जखमींना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून प्रकृती अत्यवस्थ आहे.
या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रकचालक फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर होणाऱ्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गंभीर जखमींना नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.