Nitesh Rane : 'हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र...चांदिवलीतील प्रचार सभेत नितेश राणेचा ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane : 'हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र...चांदिवलीतील प्रचार सभेत नितेश राणेचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईतील चांदिवली येथे झालेल्या प्रचार सभेत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका मांडली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मुंबईतील चांदिवली येथे झालेल्या प्रचार सभेत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका मांडली. “मुंबईवर सत्ता ही आय लव महादेव म्हणणाऱ्यांचीच असायला पाहिजे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेवर निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले, “मुंबई ही हिंदुत्वाची भूमी आहे. त्यामुळे मुंबईत फक्त ‘जय श्री राम’ म्हणणारेच निवडून दिले पाहिजेत. ज्यांना हिंदुत्वाचा अभिमान आहे, ज्यांच्या रक्तात हिंदू संस्कृती आहे, अशांनाच मुंबईकरांनी संधी द्यावी.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ठाकरे बंधूंवर टीका करताना नितेश राणे यांनी त्यांचे एकत्र येणे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप केला. “हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. यांना हिंदुत्वाची नव्हे, तर केवळ सत्तेची चिंता आहे,” असा घणाघात त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांत मुंबई महापालिकेवर सत्ता असूनही मुंबईचा अपेक्षित विकास झाला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. “मुंबईकरांना फक्त भावनिक भाषणं नकोत, तर ठोस विकास हवा आहे. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर ठाकरे बंधूंनी काय काम केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं,” असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. भाजपच्या काळात मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी नितेश राणे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा पुनरुच्चार केला. “आमचं हिंदुत्व दिखाऊ नाही. आम्ही मंदिरात जाऊन फोटो काढण्यासाठी नाही, तर हिंदू समाजाच्या हितासाठी काम करतो,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. चांदिवलीतील या प्रचार सभेत नितेश राणेंच्या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. त्यांच्या वक्तव्यावर ठाकरे गट आणि मनसेकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईत प्रचाराची धार आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com