सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांवर हल्लाबोल

सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर महाविकास आघाडीकडून आरोप केले जातात. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथांवर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, “योगी आदित्यनाथ मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील, तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? आपण इथे राजकारण करायला आला आहात की आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आला आहात?मी वाचलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला कॉन्फरन्ससाठी चालले आहेत. तिथे जाऊन आमचे मुख्यमंत्री-उद्योगमंत्री गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो करणार आहेत का दावोसच्या रस्त्यावर? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहाल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय?” असे राऊत म्हणाले.

यासोबतच “हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा. चर्चा करा. तुमच्याबद्दलचं प्रेम-आदर आम्हाला राहील. पण हे राजकीय उद्योग इथे येऊन शक्यतो करू नका”, “मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात. पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत? जर ते इथल्या उद्योगपतींना भेटायला आले असतील. त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत चर्चा करणार असतील, तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण आमच्याकडचे उद्योग ओरबाडून नेणार असतील, तर आमचा आक्षेप आहे. असे म्हणत राऊत यांनी योगी आदित्यनाथांचा समाचार घेतला आहे.

सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांवर हल्लाबोल
उत्तर प्रदेश खरंच मुंबईची फिल्मसिटी घेऊन जाणार? योगी आदित्यनाथ म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com