Maharashtra Politics : कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का!; जिल्हा संपर्कप्रमुखांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
थोडक्यात
कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का..
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ तारेंनी दिला राजीनामा...
राजकीय वर्तुळात खळबळ माजली
राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले असून, राजकीय पक्षांत हालचाली वेगाने सुरू आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटातील असंतुष्ट नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गटातही स्थानिक पातळीवर नाराजी उफाळून आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे ग्रामीणचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नेमका का दिला राजीनामा?
तारे यांनी काही महिन्यांपासून पक्षातील स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णय प्रक्रियेवर असंतोष व्यक्त केला होता. पक्षातील गटबाजी आणि आपली उपेक्षा होत असल्याची भावना असल्याने त्यांनी अखेर पद सोडण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही नाराजी व्हॉट्सअॅपवर पक्षप्रमुखांना कळवली होती. पक्षप्रमुखांनी ‘दिवाळीनंतर चर्चा करू’ असे सांगितले होते, मात्र स्थानिक राजकारणातील कटुतेमुळे तारे यांनी तत्काळ राजीनामा दिला.
साईनाथ तारे हे ठाकरे गटातील अनुभवी आणि सक्रिय पदाधिकारी मानले जातात. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे ग्रामीणमधील संघटनात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी झालेल्या या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या निवडणूक तयारीला मोठा फटका बसू शकतो.

