hingoli
hingoliTeam Lokshahi

हिंगोलीत बोगस डॉक्टरांने उभे केले थेट हॉस्पिटल

हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत चक्क आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकांची नावे

हिंगोली : झी मराठीवर मध्यंतरी बोगस डॉक्टरांवरील देवमाणूस ही मालिका चांगलीच गाजली होती. यातील अजितकुमार देव या पात्राप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातही एका बोगस डॉक्टरांने कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना थेट हॉस्पिटलच उभारले आहे. याचे उदघाटनही मोठ्या थाटामाटात केले.

ग्रामीण भागामध्ये अनेक बोगस डॉक्टर कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना राजरोसपणे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरीही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्येही बोगस डॉक्टरांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यातीलच दोन डॉक्टरांनी राज्य व केंद्राच्या वैद्यकीय परिषदेचे बोगस प्रमाणपत्र तयार करून मोठा गाजावाजा करत सेनगाव शहरात ह्दयेश हॉस्पिटल सुरु केले. व या बोगस डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात पत्रिका छापत उदघाटन केले.

ज्ञानबा टेकाळे व माधव रसाळ अशी या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. जिल्ह्यात बोगस बंगाली डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकारही त्यांनी केला. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना बोगस प्रमाणपत्राद्वारे ग्रामीण भागामध्ये तांडा वस्तीत आपले दुकान थाटले आहे. या प्रकाराची दखल घेत आरोग्य प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती.

याविरोधात तक्रार देताच या बोगस डॉक्टरांनी रातोरात आपला गाशा गुंडाळत रुग्णालय बंद केले. असे अनेक बोगस डॉक्टर जिल्ह्यामध्ये असून त्यांच्यावर ती कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य केली जाते.

उदघाटन पत्रिकेत आमदारांसह वैद्यकीय अधीक्षक, अधिकाऱ्यांची नावे

या पत्रिकेत आमदारांसह वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नावे टाकून या ठिकाणी उदघाटन सोहळा पार पडला. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकांची या उदघाटन सोहळ्याच्या पत्रिकेत नाव असूनही हे बोगस डॉक्टर आहेत ते आरोग्य विभागाला कसं कळलं नाही हा प्रश्‍न या ठिकाणी उपस्थित होतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com