Weather Update : थंडीचा निरोप, उकाड्याची चाहूल; हवामानात मोठा बदल

Weather Update : थंडीचा निरोप, उकाड्याची चाहूल; हवामानात मोठा बदल

राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत असून, नागरिकांना थंडी, उकाडा, ढगाळ वातावरण आणि वायू प्रदूषण अशा सर्वच परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत असून, नागरिकांना थंडी, उकाडा, ढगाळ वातावरण आणि वायू प्रदूषण अशा सर्वच परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, थंडीने जवळपास निरोप घेतल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. कधी सकाळी गारवा तर दुपारी उकाडा, तर कधी अचानक ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात १ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर थंडी जवळपास गायब झाली. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. जानेवारी महिन्याच्या अखेरीसच तापमान वाढू लागले असून, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात अस्थिरता वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहणार असून, ढगाळ वातावरणाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत असून, त्यामुळे हवामान सतत बदलत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यातील धुळे येथे नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, तेथे किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. मात्र एकूणच पाहता, राज्यातून थंडी जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र आहे. आज दिवसभर राज्यात धूसर वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये मात्र कडाक्याची थंडी आणि पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पंजाब, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि दिल्ली या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि दिल्लीतील वायू प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबईत सातत्याने वायू प्रदूषणात वाढ होत असून, दिवसा हवेत धुळीचे कण स्पष्टपणे दिसत आहेत. वाढलेल्या वायू प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. श्वसनाशी संबंधित आजार, सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हवामानातील सतत बदल, ढगाळ वातावरण आणि प्रदूषण यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. येत्या काही दिवसांतही हवामानात असेच बदल सुरू राहण्याची शक्यता असून, फेब्रुवारी महिन्यात राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवत आरोग्याची योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com