Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री विखे पाटलांचे वक्तव्य

Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री विखे पाटलांचे वक्तव्य

संगमनेर–अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

संगमनेर–अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. सध्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांवर टीका करताना मंत्री विखे म्हणाले की, आज विरोधकांकडे उमेदवारच नाहीत. त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी कोणीही जायला तयार नाही. ज्यांना डावलले जाईल, तेच विरोधकांचे उमेदवार असतील, असा टोला त्यांनी लगावला.

मालदाड (ता. संगमनेर) येथे आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ठाकरे बंधू जनतेसाठी नव्हे, तर केवळ एकमेकांच्या आधारासाठी एकत्र आले आहेत. मराठी माणूसच त्यांना हद्दपार करील, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा मुंबईसह राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले. उद्धव व राज ठाकरे यांची युती ही त्यांची राजकीय गरज आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही. त्यांच्या काळातच मराठी माणूस उध्वस्त झाला, याकडे लक्ष वेधत लोकांचा पूर्ण विश्वास आज महायुतीवर आहे, असा दावाही मंत्री विखे यांनी केला.

महायुतीवर जनतेचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ज्या वेगाने विकासाची प्रक्रिया सुरू आहे, त्याला मुंबईकर निश्चितच साथ देतील, असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार अमोल खताळ, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक अमित नवले, भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चतर, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, सूर्यभान नवले, हरिश्चंद्र चकोर, केशव जाधव, लहानू नवले, उत्तम नवले, परसराम नवले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाला तिलांजली देणारेच स्टार प्रचारक?

ज्यांनी स्वतःच्या तालुक्यात काँग्रेस पक्षाला तिलांजली दिली, तेच आज पक्षाचे स्टार प्रचारक झाले आहेत, याचे मला आश्चर्य वाटते, अशी टीकाही विखे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत राहणेच उचित ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे, असे सांगताना मतदारांच्या रंगीत फोटोसह नावांच्या याद्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत असतील, तर ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com