पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे यंदा ऑगस्टच्या अर्ध्या महिन्यापर्यंत पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या पाच वर्षांत २०१९ चा अपवाद वगळता एवढ्या लवकर चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती. यंदा चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची पुढील वर्षभराची चिंता आता मिटली आहे.
सध्या चारही धरणांत मिळून २९.०५ टीएमसी म्हणजेच ९९.६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली होती. तर पूर्वमोसमी पावसाने यंदा हजेरी लावली नाही. याशिवाय मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरूवातीला चारही धरणांमधील पाणीसाठा २.५५ टीएमसी म्हणजेच केवळ ८.७५ टक्के शिल्लक राहीला होता.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या परिसरात ४ जुलैपासून पावसाला सुरूवात झाली. आणि ऑगस्ट महिन्याच्या अर्ध्यातच पूर्ण पूर्णपणे भरून गेली. तर खडकवासला धरणातून आत्तापर्यंत मुठा नदीतून ९ टीएमसी पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले आहे.

