Baramati Politics : उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे; बारामती–मुंबईत हालचालींना वेग

Baramati Politics : उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे; बारामती–मुंबईत हालचालींना वेग

अजित पवार मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत चार प्रचारसभा नियोजित होत्या.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

२८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत चार प्रचारसभा नियोजित होत्या. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ सायंकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात एकही व्यक्ती बचावू शकली नाही.

अजित पवार बारामतीत दाखल होणार म्हणून कार्यकर्ते विमानतळ परिसरात स्वागतासाठी थांबले होते. सुरुवातीला अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली, मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी आली आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. दरम्यान, या विमान अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विमान हवेत एका बाजूला झुकताना दिसत असल्याने अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोण सांभाळणार, यावरून चर्चा सुरू झाली. अखेर हे स्पष्ट झाले की, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

मात्र, या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संदीप क्षीरसागर बारामतीत दाखल झाले आहेत.

यावेळी संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. अजित पवार आणि शरद पवार यांचीही हीच इच्छा होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या प्रक्रियेला खंड पडला आहे. सध्या बारामतीसह मुंबईत घडणाऱ्या या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुढील काळात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com