Nagpur : नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकाचा कायापालट; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले लोकार्पण
नागपूर विभागातील महत्वाच्या स्थानकांपैकी एक म्हणजे 'इतवारी रेल्वे स्थानक'. या स्थानकाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण आज, गुरुवारी नागपूरमध्ये करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या 'इतवारी'सह 'सिवनी', 'डोंगरगड', 'चांदा किल्ला'आणि 'आमगाव' या पाच रेल्वे स्थानकांचेही आज लोकार्पण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या 'अमृत भारत' या स्टेशन अंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर या विभागातील इतवारी स्टेशनचा पुनर्विकास करण्यात आला. गेल्या वर्षी या स्थानकाचे नाव 'नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानक' असे करण्यात आले होते. या स्थानकाचा पुनर्विकास करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागला. यामध्ये नागपूरची ओळख म्हणून नागपूरची संत्री तसेच आदिवासी संस्कृतीचे रेखाटन या रेल्वे स्थानकात करण्यात आले आहे. शिवाय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काचेची कलाकृती तर सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या इतवारी स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात आले असून त्यात तिकीट काऊंटर सुविधा, प्रशस्थ शौचालय, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, आकर्षक पोर्च, उद्यान, आकर्षक प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांसाठीच्या इतर सुविधांचा यात समावेश आहे.
प्रामुख्याने पूर्व भारताला जोडणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना या रेल्वे स्थानकात विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. छत्तीसगड-ओडिशाला जाणाऱ्या गाड्यांना या रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना इतवारी स्थानकातील आधुनिक सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. या इतवारी रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी आणि पुनर्विकास करण्यासाठी सुमारे 12 कोटी 39 लाख खर्च करण्यात आला.