Mumbai Local Update : मुंबई लोकलच्या विस्तारामुळे प्रवाशांना मिणार मोठा दिलासा
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे आता विस्तारीकरणाच्या मोठ्या टप्प्यावर उभी आहे. मुंबईमधील पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे हे दोन्ही रेल्वे जाळ्यांचा आता मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार असून या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने पावले टाकली आहेत. यामध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विचार केला गेला असून त्याद्वारे हा विकास साधला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते मात्र त्या मनाने प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता पाहायला मिळत आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC)ने याबाबत महत्वाचा निर्णय घेत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प MUTPअंतर्गंत अनेक प्रकल्पांची सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे हे दोन्ही रेल्वेदरम्यान थेट जोडणी करण्यात येणार असून, नवीन लोकल कॉरिडॉर, अद्ययावत सुरक्षा प्रणाली पंधरा डब्यांच्या वातानुकूलित गाड्यांचाही समावेश असणार आहे.
यावेळी भारतीय रेल्वे एमएमआरडीए, सिडको आणि मेट्रो यांच्या प्रकल्पांचा यावेळी आढावा घेणार असून त्यामध्ये रेल्वेगाड्यांची सुरक्षितता आणि प्रवाशांच्या मागण्या याबद्दल समग्र विचार केला जाणार आहे. रेल्वे मार्गाचे विस्तारी करण्यासाठी नवीन रेल्वे रुळांची बांधणी करण्याचा प्रस्तावही यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्म अधिक मोठे बनवणे, पंधरा डब्यांच्या गाड्यांचा विस्तार करणे या गोष्टींचा यामध्ये समावेश असेल.
प्रवाशांचे होणारे अपघात टाळण्यासाठी अद्ययावत यंत्रणा मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोघांना जोडण्याचा एक नवीन मार्गही तयार करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई लोकलचा येणारा काळात मोठा विस्तार होणार असून त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करता हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.