Surya Grahan 2026 : २०२६ चे पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण १७ फेब्रुवारीला; भारतातून दिसणार की नाही ?

Surya Grahan 2026 : २०२६ चे पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण १७ फेब्रुवारीला; भारतातून दिसणार की नाही ?

साल २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी, मंगळवारी लागणार आहे. ज्योतिष गणनेनुसार हे ग्रहण कुंभ राशी व धनिष्ठा नक्षत्रात होणार असून ते कंकणाकृती स्वरूपाचे असेल
Published by :
Varsha Bhasmare
Published on

साल २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी, मंगळवारी लागणार आहे. ज्योतिष गणनेनुसार हे ग्रहण कुंभ राशी व धनिष्ठा नक्षत्रात होणार असून ते कंकणाकृती स्वरूपाचे असेल. कंकणाकृती म्हणजेच ‘रिंग ऑफ फायर’ प्रकारातील हे ग्रहण असताना सूर्य पूर्ण झाकला जात नाही, तर त्याच्या भोवती अग्निवलयासारखा तेजोवलय दिसतो. त्यामुळे खगोलप्रेमींमध्ये या ग्रहणाबाबत विशेष उत्सुकता आहे.

किती वाजता लागणार ग्रहण?

भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी ३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजेपर्यंत चालू राहील. एकूण कालावधी सुमारे ४ तास ३१ मिनिटांचा असेल. सायंकाळी ५.१३ ते ६.११ या वेळेत ग्रहण परमोच्च अवस्थेत असेल. या काळात सूर्याचा मध्यभाग चंद्रामुळे झाकला जाईल आणि कडेभोवती तेजस्वी वलय स्पष्ट दिसेल.

सूतककाळ लागू होणार का?

धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सूतककाळ सुरू होतो. मात्र हे ग्रहण भारतातून दृश्यमान नसल्यामुळे येथे सूतककाळ मान्य केला जाणार नाही. त्यामुळे मंदिरांमध्ये नियमित पूजा-अर्चा सुरू राहतील. तरीही काही श्रद्धाळू स्वतःच्या श्रद्धेनुसार नियम पाळतात.

ग्रहणकाळात काय टाळावे?

धार्मिक समजुतीनुसार ग्रहणकाळात पूजाअर्चा, शुभकार्य किंवा मंगल कार्य टाळावे. देवी-देवतांच्या प्रतिमांना स्पर्श करू नये, अन्न शिजवू नये, अशी परंपरा आहे. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असेही सांगितले जाते. वैज्ञानिक दृष्टीने पाहता, ग्रहण सुरक्षितपणे पाहण्यासाठी विशेष सोलर फिल्टर असलेले चष्मे वापरणे अत्यावश्यक आहे.

ग्रहणानंतर काय करावे?

ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे, घरात गंगाजल शिंपडणे, देव्हाऱ्यातील मूर्ती स्वच्छ धुणे आणि दानधर्म करणे पुण्यकारक मानले जाते. अनेक जण ग्रहणानंतर अन्नदान किंवा गरजूंसाठी मदतकार्य करतात.

धार्मिक समजुतींची पार्श्वभूमी

हिंदू धर्मग्रंथांनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध राहू आणि केतूशी जोडला जातो. समुद्रमंथनाच्या कथेनुसार स्वर्भानू नावाच्या असुराने देवांच्या पंक्तीत बसून अमृत प्राशन केले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे दोन तुकडे केले. अमृतामुळे तो अमर राहिला आणि त्याचे दोन भाग राहू व केतू म्हणून ओळखले जाऊ लागले. ते वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला गिळतात, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. २०२६ मधील हे पहिले सूर्यग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. जरी भारतातून दिसणार नसले तरी याबाबतची उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com