Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC करताय? तर सावध व्हा फेक वेबसाईट्स होत आहेत व्हायरल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आता सरकारने सर्व लाभार्थींना e-KYC करणे बंधनकारक केले असून या प्रक्रियेसाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. काही महिलांना ही प्रक्रिया नेमकी कशी करायची याबाबत गोंधळ होता.
जाणून घ्या e-KYC करण्याची योग्य प्रक्रिया काय आहे?
सर्वप्रथम लाभार्थींना https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यानंतर संबंधित फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थींनी आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून Send OTP वर क्लिक करायचे आहे. आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
सिस्टम तपासून पाहील की e-KYC आधीच पूर्ण झाली आहे का. जर पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक पात्र यादीत आहे का याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर लाभार्थींनी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून OTP द्वारे त्याची खात्री करावी लागेल. पुढे जाताना महिलांना आपला जात प्रवर्ग निवडून काही अटींना संमती द्यावी लागेल.
यात कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत कायमस्वरूपी कार्यरत नाही किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही, तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, याची खात्री करून Submit करावे लागेल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
फेक वेबसाईटपासून सावध राहा
पण, याच दरम्यान गुगलवर काही फसवे वेबसाईट्स दिसू लागले आहेत, जे वापरणाऱ्यांचे बँक खाते रिकामे करू शकतात. कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर आपली माहिती दिल्याने तुमचे पैसे धोक्यात येऊ शकते. यामुळे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ई-केवायसी केवळ सरकारी पोर्टलवरच करा. महिलांनी वेळ न दवडता दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.