Manoj Jarange Patil Azad Maidan : "...सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत नव्हते" मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप
Manoj Jarange Patil Azad Maidan on Mahayuti Goverment : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोठा मोर्चा आज मुंबईत दाखल झाला आहे. आझाद मैदानावर आंदोलकांची प्रचंड गर्दी उसळली असून पुन्हा एकदा उपोषण सुरू होणार आहे.
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन करताना म्हटले, “मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी आपली आहे. गडबड-गोंधळ नको, पोलिसांना सहकार्य करा. गाड्या सांगतील तिथेच पार्क करा.” सरकारवर गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितले की, “सरकार आपल्याला सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत नव्हते, म्हणूनच आम्हाला मुंबई गाठावी लागली.”
आंदोलनकर्त्यांनी शांततेने आंदोलन करावे, अशी सतत विनंती करत जरांगे पाटील यांनी समाजाला आठवण करून दिली की, “आपल्या समाजाला आरक्षणासाठी 70 वर्षे वाट पाहावी लागली. हे कोणत्याही मराठ्याने विसरू नये.” सरकारने अखेर परवानगी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले, मात्र पुढील दिशा ठरवण्यासाठी समाजाच्या एकजुटीची गरज असल्याचे ते म्हणाले.
आझाद मैदानावर सुरू झालेल्या या आंदोलनाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या आंदोलनातून काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.